Advertisement
पुणे/भोसरी : शाहू शिक्षण संस्थेच्या पुणे शाखांमध्ये "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शिक्षण संस्थेच्या ओअॅसिस इंग्लिश मिडीयम स्कुल व ज्यु. कॉलेज, अनुलक्ष स्मार्ट कॅम्पस व राणी पुतळाबाई महिला विधी महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापकांकडून, शिक्षक आणि कर्मचारी यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी शिक्षण संस्थेच्या संचालक ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचे भाषण लक्षवेधी ठरले...त्यातील काही महत्वाचे मुद्दे असे...
वंदनीय शिक्षकवर्ग व येथे उपस्थित माझ्या बंधु-भगिनींनो. आज 15 ऑगस्ट ! आपण सर्वजण इथे आपल्या भारताचा 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम, तुम्हा सर्वांना आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! बंधु-भगिनींनो, 15 ऑगस्ट हा आपल्या देशाच्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947ला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. देशाला स्वातंत्र्य सहजा-सहजी मिळालेले नाही. यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या सर्व हुतात्म्यांना वंदन. त्या इतिहासाबद्दल जास्त बोलणार नाही. तो आपण सर्व जण जाणता. परंतु, आज जे येथे उपस्थित लढवय्ये आहेत, त्यांचा उल्लेख नक्की करायला आवडेल. आज, 76वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा होत असला तरी मागील दोन वर्ष कोरोनाच्या काळात मोठी आव्हानात्मक गेली. त्यातून देश मोठ्या हिंमतीने सावरला. त्यातील एक घटक आज येथे उपस्थित आहे. तो म्हणजे शिक्षक. त्यांना आपण कोरोना योद्धेही म्हणून शकतो. कोरोनामुळे शाळा बंद झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोठेही खंड पडू न देता अगदी परिक्षा आणि शालेय सर्व कामे वेळेत झाली. आर्थिक संकटातही शिक्षकांनी साथ-सोबत दिली. येथे उपस्थित शेतकरी बांधवांनाही माझा सलाम..., कारण सर्व इंडस्ट्री बंद असताना शेती ही एकमेव इंडस्ट्री सुरू होती. डॉक्टरांचेही या काळात मोठे योगदान राहिले, त्यांचे आभार मानताना शब्दही कमी पडतील. करोना काळ कठीण होता, देशाच्या सर्वच बाबींना कलाटणी देणारा होता. त्यामुळे या घटकांचे योगदान मोलाचे आहे. त्यामुळे आजच्या या विशेषदिनी त्यांचा उल्लेख करावा वाटला.
खरं तर...
मी कोणी मोठी वक्ता, व्याख्याती नाही... विचारवंतही नाही. परंतु, ज्या संस्कारात वाढले त्यातून आपल्या समाजाबद्दल, राज्याबद्दल आणि देशाबद्दल नेहमीच ऐकत आणि पाहत आले. त्यावेळी शासनाने काय निर्णय घेतला, दिल्लीत काय झालं हे घरात लगेचच कळायचं. आज, ज्यावेळी स्वत: बाहेर पडून समाजात वावरत आहे, समाजात खूप वेगळी व्यक्तीमत्व भेटत आहेत. त्यातूनही खूप काही पहायला आणि शिकायला मिळत आहे, आपल्या देशातील विविध पैलूंचे दर्शन अशा लोकांतून होते. यातूनच विचार करण्याची प्रेरणा मिळत आहे.
सकारात्मक दृष्टिने पाहिले की, आपल्या देशाने स्वातंत्र्यानंतर कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, साहित्य, खेळ अशा सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केल्याचे दिसते. आज, देशाकडे स्वतःची आण्विक शस्त्रे आहेत. देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. हे ऐकलं, वाचलं की समाधान वाटते. परंतु, तरीही देशापुढे गुन्हेगारी, हिंसाचार, नक्षलवाद, दहशतवाद, महागाई, भ्रष्टाचार, गरीबी , बेरोजगारी यासारख्या समस्या आहेत. आपण रोजगाराच्या पुरेशा संधी खरोखरच निर्माण करू शकलेलो नाही. प्रगतीशील कृषीराष्ट्र ही आपली ओळख असली तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं काय? असे काही प्रश्न उपस्थित राहिले की आपण गेल्या 75 वर्षांत नेमकं काय मिळवलं? आणि काय गमावलं? याचा विचार प्रत्येकाने करायला हवा, असे सांगावे वाटते. या समस्यांचे पूर्ण उच्चाटन झाल्याशिवाय देश सुखी, संपन्न व प्रगत होणार नाही, असे वाटते. हे रोखण्यासाठी शिश्चितच त्या-त्या यंत्रणा कार्यरत राहतील. मात्र, आपलीही आपल्या देशाप्रती जबाबदारी आहे. देशाने माझ्यासाठी काय केले? यापेक्षा मी माझ्या देशासाठी काय केले हा विचार खूप महत्त्वाचा आहे. तो ज्यावेळी समाजबांधवांमध्ये रूजेल त्यावेळी अनेक समस्या, प्रश्नांची उत्तरे आपोआप सापडतील.
खरं तर.., गेल्या 75 वर्षांत देश आणि राज्यात अनेकदा सत्तांतरे झाली. विविध विचारधारांचे पक्ष आणि संघटना उदयाला आल्या. ढोबळे साहेबांच्या काळात जे होतं ते मूल्यात्मक राजकारण हळूहळू बाद होत गेले आणि हितसंबंधाच्या विध्वंसक "खेळा'लाच आज सगळे जण राजकारण म्हणायला लागले आहेत. देश, राज्य चालवायला तेवढीच्या विचारधोरेची आणि क्षमतेचे नेतृत्त्व गरजेचे आहे. "धर्मनिरपेक्ष समतावादी आणि लोकशाहीला' महत्त्व देणारे प्रतिनिधीत्व गल्लीपासून दिल्लीपर्यंत असायला हवे, आणि ती आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे आवर्जून नमूद करावे वाटते.
हे सगळं बोलायला छान वाटतं. पण, हे सगळ करण्यासाठी मोठी मानसिक ताकद लागते. गेल्या काही वर्षांपासून त्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. वेळोवेळी याबाबत आपल्याशी चर्चा करेनच. आज, अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहोत, ही घटना अत्यंत आनंददायी आहे. किमान पुढील काही वर्षांत आणखी चांगले बदल घडतील, देश विविध क्षेत्रात उत्तरोत्तर प्रगती करेल, अशी अपेक्षा बाळगून सर्व उपस्थित सन्मानीय मान्यवरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते आणि थांबते.
जयहिंद. जय भारत.
