Advertisement
सोलापुर : सोलापुर झेडपीच्या समाजकल्याण विभागातील विविध योजनांची चौकशी सुरू झाली आहे. समाजकल्याण आयुक्तालयाच्या (निरीक्षण) विशेष अधिकारी मनीषा फुले यांच्या नेतृत्वाखाली शासकीय पथक चौकशीसाठी सोलापुरात दाखल झाले आहे.
मोहोळ तालूक्याचे भाजपा सरचिटणीस संजीव खिलारे यांनी समाजकल्याण विभागाच्या योजनेत नियमबाहय कामकाज होत असल्याची तक्रार महाराष्ट्र शासनानकडे केली होती. समाजकल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणार्या दलितवस्ती विकास योजनेची कामे वाटताना टक्केवारी घेतल्याचा आरोप डीपीसीत करून आमदार राम सातपुते यांनी खळबळ उडवून दिली होती. याप्रकरणी संबंधीतांवर कारवाई न झाल्यास आमदारकीचा राजीनामा देण्याचाही त्यांनी इशारा दिला होता. त्याआधी झेडपीच्या तत्कालीन सदस्यांनी ही १६ कोटी ५० लाखांचा निधी समाजकल्याण समितीची मान्यता न घेता परस्पर वाटप केल्याची तक्रार जिल्हाधिकार्यांकडे दिली होती. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते. झेडपी समाजकल्याण विभागाची सोमवारपासून चौकशी सुरू झाली. तक्रारदार मोहोळ तालुक्यातील असल्याने एका नेत्याने कार्यालयात हजेरी लावल्याची चर्चा जिल्हा परिषदेत रंगली होती. आमदार सातपुते यांच्या तक्रारीचे काय झाले असा सवालही लोकांमधून उपस्थित होत आहे.
