Advertisement
नाशिक : नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (25 ऑगस्ट) धडाकेबाज कारवाई केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबीने काल एका बड्या अधिकाऱ्याला तब्बल 28 लाखांची रोख रकमेची लाच घेताना रंगेहात पकडलं होतं. एसीबीच्या या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. एसीबी अधिकाऱ्यांनी आरोपी अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्यानंतर या अधिकाऱ्याकडे शंभर कोटींपेक्षा जास्त मालमत्ता असल्याची भीती वर्तवली जात होती. त्यानुसार पोलीस अधिकाऱ्यांकडून तपासाला सुरुवात झाली होती. विशेष म्हणजे एसीबीने आतापर्यंत केलेलेल्या कारवाईत जवळपास दीड कोटींपर्यंतची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. एसीबी अधिकाऱ्यांकडून अजूनही तपास सुरु आहे. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल आदिवासी विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांना अटक केली होती. बागुल यांनी सेंट्रल किचन बिल मंजुरीसाठी एका ठेकेदाराकडे तब्बल 28 लाखांची लाच मागितली होती. दीड कोटी रुपयांचं बिल मंजूर करण्यासाठी या अधिकाऱ्याने बिलाच्या रकमेच्या 12 टक्के रक्कम लाच म्हणून मागितली होती. अखेर एसीबी अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कारवाई करत बागुल यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
