Advertisement
सोलापूर : महाराष्ट्रात अस्थिर सरकार आहे. त्यामुळे कुठेतरी त्याची खंत वाटते. आज सरकार बदलून 32 दिवस होत आहेत. तरीही दोन लोकांवर सरकार चालतंय. काय रे ते झाडी डोंगर असे त्यांचे जरी ओके असलं तरी महाराष्ट्रातील जनतेच नॉट ओके आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी शिंदे सरकारवर टीका केली.
काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात श्री नागदेवता याचे दर्शन घेतले. त्यांनतर प्रणिती शिंदे यांनी महिलासोबत मनमुराद झोक्याचा आनंद लुटला. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना प्रणिती शिंदे यांनी भाजपवर सडकून टीका केली. 'खूप खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे. जी केस 2015 साली क्लोज झालीय ती आज पुन्हा काढून सोनिया गांधींना त्रास दिला जातोय. केवळ हम बोले सो कायदा दाखवण्याचे काम सुरू आहे. सोनिया गांधी या देशाच्या एवढ्या वरिष्ठ नेत्या, एका मोठ्या पक्षाच्या प्रमुख असून त्यांना दहा दहा वेळा ईडी चौकशीला बोलवले जाते. राहुल गांधींना बोलावून घेताय. सहा सहा तास चौकशीला बसवताय आणि एकच तास चौकशी करताय ती ही व्यर्थ, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी मोदी सरकारवर केली.
