Advertisement
मंगळवेढा : मंगळवेढा शहरामध्ये डेंग्युसदृश्य ५ संशयित रुग्ण आढळल्याने ग्रामीण रुग्णालयाकडून घरोघरी सर्व्हे सुरु केला आहे. सध्यस्थितीला हवामानातील बदलामुळे व्हायरल इन्फेक्शन होवून ताप, सर्दी, खोकला यांचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. दि. २६ जुलै अखेर जवळपास २८०० रुग्णांची नोंद झाली असल्याचे रुग्णालयाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले. दि. १ जुलै ते २६ जुलै अखेर ग्रामीण रुग्णालयाकडे २८०० रुग्णांची नोंद ओपीडीकडे झाली आहे. सध्या पावसाळा सुरु असल्याने कुंडया व टायरमध्ये अथवा डबक्यात साचून राहिलेल्या पाण्यामध्ये डेंग्युच्या अळ्या होत आहेत. परिणामी डेंग्युसदृश्य रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे.
अशी घ्यावी खबरदारी :
आत्तापर्यत डेंग्युसदृश्य ५ रुग्ण शहरामध्ये आरोग्य विभागाला मिळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर शहरात पाणी तपासणी, डासांचे निर्मुलन, आबेट गोळी वाटप मोहिम सेविकामार्फत सुरु असल्याचे डॉ. दिपक धोत्रे यांनी सांगितले. नागरिकांनी पाणी साचून राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी. टायरमध्ये, कुंडयात पाणी साठले असल्यास ते सांडून द्यावे, सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशी लक्षणे आढळल्यास अंगावर न काढता तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
