Advertisement
मंगळवेढा : माचणूर ता. मंगळवेढा येथील सिद्धेश्वर मंदिरातील गणपती मूर्तीच्या फरशीची तोडफोड करणाऱ्या पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय माचणूर व पंचक्रोशीतील ग्रामस्थानी आज बैठक घेऊन घेतला आहे.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करीत ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच मंदिरात विकासकामे करताना पुजारी मंडळ व ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच करावीत, अशा सक्त सूचना पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांना केल्या.
गणेश चतुर्थी (दि ३१) दिवशी पुरातत्व विभागाने तोडफोड केल्याने भावी भक्तातून तीव्र संताप व्यक्त होत होता. या घटनेमुळे दामाजी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, डीवायएसपी राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक रणजितसिंह माने यांनी प्रत्यक्ष मंदिरात येवून संतप्त भाविकांच्या भावना जाणून घेतल्या.
