Advertisement
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानकडून आयोजित करण्यात आलेला गणेशोत्सव वादात सापडला आहे. कारण राज्यभरात गणेशोत्सावाचा उत्साह असताना नाथ प्रतिष्ठानने परळीत आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात पहिल्याच दिवशी लावण्या आणि अश्लील नृत्य सादर करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम चालला. या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजीदेखील बघायला मिळाली होती. त्यामुळे पोलिसांना काही प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला होता. पहिल्या दिवशी घडलेल्या या घटनेवर सर्वसामान्यांकडून टीका करण्यात आली होती. पण दुसऱ्या दिवशी देखील फार काही परिस्थिती बदललेली दिसली नाही.
दुसऱ्या दिवसी कोमल पाटोळे यांचा जागरण गोंधळ, भारुड आणि गवळण सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात परळीतील नागरिकांची प्रचंड गर्दी केली होती. गर्दीमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याने गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांकडून तरुण प्रेक्षकाला लाठीने बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यामुळे नाथ प्रतिष्ठांच्या उत्सवाचे वेगळी चर्चा होत आहे.
