Advertisement
मुंबई : देशवासियांच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वापरावर बंधन घालून केंद्रातील भाजप सरकारने नागरिकांच्या जेवणावर, सण - उत्सव साजरे करण्यावर आणि एकंदरीत मुलभूत हक्कांवरच बंधन घातले आहे. त्यामुळे या निर्णयाचा एक गृहिणी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर निषेध केला आहे.
देशातील महिलांच्या हिताचा निर्णय घेण्याऐवजी मोदी सरकारने गृहिणींच्या चिंतेत आणखी भर घालण्याचं काम केल आहे. एकीकडे एलपीजी गॅस सिलेंडर दरात भरमसाठ वाढ करायची आणि दुसरीकडे गॅस सिलेंडर वापरावर मर्यादा आणायची, यातून केंद्रसरकार किती असंवेदनशील आहे हेच दिसून येते असा जोरदार हल्लाबोलही खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत केला आहे.
केंद्राच्या नव्या नियमानुसार उज्वला गॅस योजनेचा लाभार्थी नसलेल्या ग्राहकाला वर्षभरात केवळ 15 आणि अनुदानित असलेल्या ग्राहकाला 12 तर दोघांसाठीही महिन्याचा कोटा 2 सिलेंडरचा करून मोदीसरकारने प्रत्येक गृहिणीच्या चिंतेत आणखी भर घातली आहे, असंही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
