Advertisement
मुंबई : बीकेसीमध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी शिंदे गटाकडून सुरू आहे. शिंदे गटाच्या या दसरा मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं भाषण होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. याबाबत आता शिंदे गटाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. इतर पक्षांच्या नेत्यांना बोलावण्याचं कोणतंही नियोजन नाही. हिंदुत्वाचा विचार मानणारे पाहुणे आले तर त्यांचं स्वागत करू, मात्र हिंदुत्वाच्या विचारांशी फारकत घेतलेल्यांना स्थान नाही, असं शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची गेल्या काही दिवसांमध्ये दोन वेळा भेट झाली, तेव्हापासून राज ठाकरे दसरा मेळाव्यात भाषण करतील, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.
दसरा मेळावा उत्साहातच होईल, प्रत्येक विभागाची तयारी सुरू आहे. दसरा विचारांचं सोनं लुटण्याकरता निवडलेला दिवस आहे. बाळासाहेबांच्या विचारांवर एकनाथ शिंदे चालत राहिले आहेत. मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कारभार सांभाळून लोकांना भेटत आहेत. मंत्रालय तुडूंब भरलेलं असतं,' अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली.
