Advertisement
मुंबई : मुंबईत ऐतिहासिक दसरा मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने तीन हजार, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने 1400 खासगी बस आरक्षित केल्या आहेत. यामुळे यंदाचा दसरा मेळावा अतिशय मोठा होणार असून बस मालकांची दिवाळी होणार आहे.
शिवसेनेच्या यंदाचा दसरा मेळावा काहीसा वेगळा असणार आहे. कारण, शिवसेनेत दोन गट आहेत. दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्यात शक्तिप्रदर्शन करून आपणच मूळ शिवसेना असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न होणार आहे.
मुंबई महानगर प्रदेशासह पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भ, खान्देश येथून मुंबईत येण्यासाठी खासगी बसगाड्यांचं आरक्षण करण्यात आल्याची माहिती राज्यातील खासगी बस मालकांनी दिली. मुंबईत दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच बुधवारी दुपारपर्यंत या गाड्या पोहोचतील. 500 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या ठिकाणांवरील गाड्या मंगळवारी रात्रीच मुंबईच्या दिशेने रवाना होतील आणि बुधवारी याठिकाणी पोहोचतील. तर मुंबई महानगर प्रदेशातील वाहनं बुधवारी सकाळी नियोजित सभास्थळासाठी रवाना होतील.
