Advertisement
मुंबई : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी कार अपघातात मृत्यू झाला. आता या अपघाताप्रकरणी पोलिसांनी मोठे खुलासे केले आहेत. या गाडीमधील दोन्ही मृतांनी सीट बेल्ट लावलेला नव्हता, असं एका पोलीस अधिकाऱ्याने प्राथमिक तपासानंतर सांगितलं आहे. ते पुढे म्हणाले की, गाडी अतिशय वेगात होती, त्यामुळे चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाला असावा. मुंबईपासून 120 किमी अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील चारोटी चेकपोस्ट ओलांडल्यानंतर लक्झरी कारने अवघ्या 9 मिनिटांत 20 किलोमीटरचे अंतर कापले होते. यावरुन ही गाडी अतिशय वेगात असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. सूर्या नदीवरील पुलावरील रस्ता दुभाजकाला कार धडकल्याने मिस्त्री आणि जहांगीर पंडोळे हे जागीच ठार झाले.मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला परतत असताना दुपारी अडीच वाजता ही दुर्घटना घडली. मुंबईतील स्त्रीरोगतज्ज्ञ अनाहिता पंडोळे (55) या कार चालवत होत्या. या अपघातात अनाहिता आणि त्यांचा पती गंभीर जखमी झाले आहेत. "प्राथमिक तपासणीनुसार, ओव्हरस्पीडिंग आणि चालकाच्या चुकीच्या निर्णयामुळे कारचा अपघात झाला. दोन्ही मृतांनी सीट बेल्ट घातला नव्हता,” असं अधिकाऱ्याने रविवारी रात्री सांगितलं.
अधिकाऱ्याने सांगितलं की "चारोटी चेकपोस्टवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपलेल्या फुटेजमधून पालघर पोलिसांना आढळलं की कारने दुपारी 2.21 च्या सुमारास चेकपोस्ट ओलांडला होता आणि अपघात 20 किमी पुढे (मुंबईच्या दिशेने) झाला होता" यावरून मर्सिडीज कारने 20 किमीचे अंतर (चीक पोस्टपासून) अवघ्या 9 मिनिटांत कापल्याचं दिसून येतं. अधिकारी म्हणाले की, सूर्या नदीवरील पुलावर दुपारी 2.30 वाजता हा अपघात झाला.
मिस्त्री आणि जहांगीर पंडोळे मागच्या सीटवर होते. डॅरियस अनाहितासोबत पुढच्या सीटवर होता, असं पोलिसांनी सांगितलं. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, एक महिला कार चालवत होती आणि तिने डाव्या बाजूने दुसर्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचं नियंत्रण सुटलं आणि गाडी रस्ता दुभाजकावर आदळली. पोलिसांनी सांगितलं की अपघातानंतर 10 मिनिटांत मदत पोहोचली.