#

Advertisement

Tuesday, October 4, 2022, October 04, 2022 WIB
Last Updated 2022-10-04T10:58:45Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

माजी मंत्री ढोबळे यांना फलकावर "डावलले" ; उतावीळ खोरांमुळे भाजपा पायावर धोंडा पाडून घेणार !

Advertisement

 


मंगळवेढा : मंगळवेढयात काही स्वघोषित उतावीळ खोरांमुळे भारतीय जनता पक्ष आगामी निवडणुकांत स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणार, असच काहीस वेळोवेळी स्पष्ट होता आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्वागतसाठीचे फलक लावताना या फलकांवरुन माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना वगळण्यात आल्याने ढोबळे समर्थकांतून मोठ्या प्रमाणात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील भाजप चे भक्कम नेतृत्व म्हणून ज्यांची दहशत विरोधकांना आज वाटत आहे, अशा लक्ष्मण ढोबळे यांना काही उतावीळ "कॉर्नर" करत आहेत. याबाबत ढोबळे गटाने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. सदर बाब ढोबळे यांच्या कन्या अ‍ॅड. कोमल ढोबळे साळुंखे यांना समजताच त्यांनी ही, असले  पोरकट राजकारण करणाऱ्यांना भाजप चे वरिष्ठ नेते जवळ करत नाहीत, असे स्पष्ट करीत या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली

पंढरपूर-मंगळवेढा या ऊस पटयात माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांनी महाविकास आघाडीला धक्का देत कमळ फुलविले आले तरी यात माजी मंत्री ढोबळे यांची भूमिका मोठी राहिली आहे, परंतु याचा विसर अनेकांना लवकर पडला असल्याचे दिसते. म्हणूनच राज्यात व केंद्रातील सत्तेचा लाभ घेताना आमदार समाधान आवताडे हे सत्तेचा "उपयोग" करुन घेतात, अशी चर्चा आहे. मतदार संघासाठी कोटयावधीचा निधी मिळविला असला तरी संत दामाजी सहकारी साखर कारखाना निवडणूकीनंतर मंगळवेढयातून भाजपाचे कार्यकर्ते  आमदार आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक गटात विभागली गेले. हे गटातटाच असच सुरू राहील तर आगामी निवडणुकीत वेगळे चित्र दिसू शकते. हीच गोष्ट लक्षात घेत जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेटटी यांनी यापुढील निवडणूका पक्षाच्या चिन्हावर लढविण्याचे संकेत देत एकसंघ राहण्याचा सल्ला दिला, त्यानंतरही आज उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्वागतासाठी मंगळवेढा भाजपाच्या वतीने लावण्यात आलेल्या फलकावर माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना डावलण्यात आले. वास्तविक पाहता माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे हे कॉग्रेस व राष्ट्रवादीतून वीस वर्षे मंगळवेढयातून लोकप्रतिनिधी राहिले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणूकीपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिटटी  देत भाजपा मध्ये प्रवेश करीत आता, माझे मरण आणि शोकसभा भाजापा मध्येच होईल, अशी ठाम भूमिकाही त्यांनी मांडली, असे जाहीरपणे सांगणारा नेता भाजपाला अद्याप तरी राज्यात कोठे सापडलेला नाही. 2019 च्या निवडणूकीत व पोटनिवडणूकीत लक्ष्मण ढोबळे यांनी पक्षाचा नेटाने प्रचार केला.  तसेच, दामाजी कारखाना निवडणूकीत निर्णायक ठरलेल्या ढोबळे गटांनी यंदा दोन्ही भाजप गट दामाजीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने प्रचाराच्या व्यासपीठापासून दूर राहण्याची भूमिका घेतली, स्वतः पेक्षा पक्षाचा विचार करणारे ढोबळे यांच्याबाबत जर फलक, फोटोंचे राजकारण होत असेल तर ते भाजपसाठी हानिकारक ठरू शकते. कारण, सोलापूरचे विदयमान खासदार जयसिध्देश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जातीच्या दाखल्यावरुन भविष्यात त्यांना संधी मिळण्यावरुन शाशंकता आहे, त्यामुळे भाजपचे उमेदवार म्हणून लक्ष्मण ढोबळे यांचा विचार होऊ शकतो, कॉग्रेसने आमदार प्रणिती शिंदेना संधी दिली तर अ‍ॅड. कोमल ढोबळे देखील दावेदार होऊ शकतात. मात्र, फलकावरुन माजी मंत्री ढोबळे यांना डावलले जात असेल तर ढोबळे गट भाजप सोबत राहील का? हे विचार करण्यासारखे आहे.

आज, माजी मंत्री ढोबळे यांच्याबाबत आज, झालेल्या प्रकाराबाबत त्यांच्या कन्या अ‍ॅड कोमल ढोबळे साळुंखे यांनी नाराजी व्यक्त करीत सोशल मिडीयात कार्यकर्ते, पत्रकारांनीच  याचा अभ्यास करावा, असे संकेत दिले. माजी मंत्री ढोबळे यांच्याप्रमाणेच अ‍ॅड. कोमल ढोबळे साळुंखे या हजरजबाबी असल्यामुळे आगामी काळात ढोबळे यांच्या हालचाली काय असतील, याबाबत चर्चा सुरु झाली आहे.