Advertisement
मुंबई : वायुसेना दिनाच्या औचित्याने (8 ऑक्टोबर) आता भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी आज दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. त्यानुसार भारतीय हवाई दलात अग्निपथ योजनेतून महिला अग्निवीरांची भरती केली जाणार आहे. तसंच हवाई दलात एक नवीन शाखा सुरू केली जाणार आहे.
देशभरात आज ( 8 ऑक्टोबर) वायुसेना दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या दिनाचं औचित्य साधून एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यानुसार, आता हवाई दलात पुढील वर्षापासून महिला अग्निवीरांची भरती केली जाणार आहे. तसंच नवीन `वेपन सिस्टीम ब्रांच` अर्थात शस्त्र प्रणाली शाखा सुरू केली जाणार आहे. वायुसेना दिनानिमित्त चंडीगडमध्ये फुल डे रिहर्सलचं आयोजन करण्यात आलं आहे.
एअर चीफ मार्शल चौधरी म्हणाले, `सरकारने भारतीय हवाई दलातील अधिकाऱ्यांसाठी वेपन सिस्टीम ब्रांच तयार करण्यास मान्यता दिली आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच नवीन ऑपरेशनल शाखा तयार होणार आहे. ही शाखा मूलतः हवाई दलातली सर्व प्रकारची अत्याधुनिक शस्त्रास्त्र प्रणाली हाताळेल. यामुळे 3400 कोटी रुपयांची बचत होईल. तसंच पुढील वर्षापासून हवाई दलात महिला अग्निवीरांची भरती करण्यासंदर्भात योजना आखली जात आहे.`
