Advertisement
नवी दिल्ली : मागची दोन वर्षं जगासह भारतात कोरोनाने हाहाकार माजवला. या भयंकर संसर्गजन्य रोगामुळे लाखो जणांना आपला जीव गमवावा लागला. दोन वर्षं कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली जगत असताना यावर्षी संसर्ग आटोक्यात होता. परंतु आता भारतात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. देशात एकाच दिवसात 2797 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ही संख्या मागच्या काही दिवसांतल्या रुग्णसंख्येपेक्षा सुमारे 900 पेक्षा अधिक आहे. रुग्णसंख्या वाढत असताना संसर्ग झालेले रुग्ण झपाट्याने बरे होत आहेत ही दिलासादायक बाब आहे. देशात सक्रिय रुग्णांची संख्या 30 हजारांच्या खाली आली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, शनिवारी (8 ऑक्टोबर) संपलेल्या 24 तासांत देशात 2797 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे याच कालावधीत 3884 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 29,251 आहे. डेली पॉझिटिव्हिटी रेट 1.05 टक्के आहे.
शुक्रवारी (7 ऑक्टोबर) किती रुग्णसंख्या :
देशात कोरोनाबाधित शुक्रवारी नवे 1997 रुग्ण आढळून आले असून, भारतातल्या आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4,46,06,460 एवढी झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या शुक्रवारी 30,362 होती. गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाने मृत्यू झालेल्यांची संख्या 9 आहे. मंत्रालयाने म्हटलं आहे, की एकूण संसर्गग्रस्तांपैकी सक्रिय रुग्ण 0.07 टक्के आहेत, तर राष्ट्रीय कोविड रिकव्हरी दर 98.75 टक्क्यांवर पोहोचला आहे.
