Advertisement
मुंबई : निवडणूक आयोग एक नोव्हेंबर 22 ला गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा करू शकतो. ही निवडणूक दोन टप्प्यांत होऊ शकते. पहिल्या टप्प्यासाठी एक ते दोन डिसेंबर आणि दुसऱ्या टप्प्यासाठी चार ते पाच डिसेंबर रोजी मतदान होईल. तर, निकाल 8 डिसेंबरला जाहीर होईल, अशा तारखा असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच गुजरातमध्ये आचारसंहिता लागू होईल. याआधीच गुजरातमध्ये भाजप आपला शेवटचा डाव खेळण्याच्या तयारीत आहे. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकार युनिफॉर्म सिव्हिल कोड अर्थात, समान नागरी कायदा आणण्याची घोषणा करू शकतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार एक समिती तयार करू शकतं. ही समिती समान नागरी कायद्याच्या शक्यता पडताळून पाहणार आहे. त्यासाठी विविध पैलूंचं मूल्यमापन केलं जाणार आहे. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश या समितीचे अध्यक्ष असतील.
कायद्याच्या दृष्टीने सर्व समान आहेत. सर्व जाती, धर्म, लिंगाच्या व्यक्तींसाठी कायदा समान आहे. विवाह, घटस्फोट, दत्तक घेणं, वारसा हक्क, वारसा या सर्व बाबींपेक्षा देशात स्त्री-पुरुष समानता आणण्यासाठी समान नागरी कायद्याची गरज भासू लागली आहे. जर समान नागरी कायदा लागू झाला तर भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी, धर्म किंवा जातीचा निकष न लावता समान कायदा असेल. ज्या राज्यात समान नागरी कायदा लागू होणार आहे, तिथे या गोष्टींची तत्काळ अंमलबजावणी होईल.
