Advertisement
मुंबई : अंधेरीच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला शह देण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना गटाने जोरदार प्रयत्न करत आहे. पण, आता शिंदे गट शिवसेनेला मैदानात थेट भिडणार नाही. शिंदे गटाने या निवडणुकीतून माघार घेतली असून भाजपच्या उमेदवारास पाठिंबा देण्याचा निर्णय शिंदे गटाने घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी यांच्यामध्ये वर्षा बंगल्यावर बैठक झाली. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार असला तरी युती म्हणून बाळासाहेबांची शिवसेना गट युतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार आणि सभा तसंच रोड शोमध्येही सहभागी होणार असं या बैठकीमध्ये ठरलं आहे. शिंदे गटाकडूनही डमी उमेदवार दिला जाणार अशी शक्यता होती. पण, आतापर्यंत झालेला संघर्ष पाहता शिंदे गटाकडून डमी उमेदवार उभं करण्याचा प्रस्ताव आता मागे घेण्यात आला आहे. वर्षा बंगल्यावरील बैठक संपल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याशी अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीसंदर्भात चर्चा केली.
