Advertisement
मुंबई : आत्मविश्वास होता, म्हणून तर 50 आमदारांसोबत 13 खासदार माझ्यासोबत आले. महाविकासआघाडीचं सरकार कोणासोबत काम करत होतं? कुणासाठी सरकार चालत होतं? हे सर्वसामान्यांना मान्य नव्हतं, म्हणून सर्वसामान्यांचं सरकार आम्ही स्थापन केलं आहे. 30 जूनलाच आम्ही ज्यांना हात दाखवायचा त्यांना दाखवला आहे. चांगला हात दाखवला आहे, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी शिर्डी दौऱ्यावर गेले होते. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक साईबाबांचं दर्शन घेतलं. शिर्डी दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाला हात दाखवल्याचा आरोप होत आहे. या मुद्द्यावरून शरद पवार यांनी शिंदेंवर टीका केली.
'आम्ही जे करतो ते उघडपणे करतो. काल माझ्यासोबत दोन मंत्री होते. सगळी मीडिया होती, काही लपून छपून करत नाही, दिवसाढवळ्या करतो. काही लोक लपून छपून करतात,' अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.
'कामाख्या देवीला जाणार हे जाहीरपणे सांगितलं आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार घेऊन हे सरकार आम्ही स्थापन केलं आहे. कुठल्याही मंदिरात जाण्यासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारचा अडथळा वाटत नाही', असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
