Advertisement
शिरूर : भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारीला सुरूवात केली आहे. शिरूर मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे. उमेदवार कोणीही असो, शिरूरमध्ये भाजपच लढेल, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी केला आहे. आढळराव पाटीलच काय, अमोल कोल्हेही भाजपमध्ये आले तर स्वागतच आहे, असं प्रल्हादसिंग पटेल म्हणाले आहेत, त्यामुळे शिरूरमध्ये भाजपचा उमेदवार कोण? आढळराव पाटील किंवा अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार का? अशा चर्चा आहे. आतापासूनच भाजप नेत्यांचे शिरूर मतदारसंघात दौरे सुरू झाले आहेत.
मागच्या काही दिवसांपासून अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आपल्या चित्रपटासाठीही अमोल कोल्हे अमित शाह यांना भेटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनालाही अमोल कोल्हे गैरहजर राहिले. गुजरात निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतही अमोल कोल्हे यांचं नाव नव्हतं. या सगळ्या घटनांमुळे अमोल कोल्हे वेगळा निर्णय घेणार का? अशा चर्चांना उधाण आलं. अमोल कोल्हे यांनी मात्र आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज नसल्याचं स्पष्टीकरण दिलं.
