Advertisement
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मिशन 45 अभियान या आधीच सुरू केली आहे. या अभियानाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक भाजपने बोलवली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यालयात ही बैठक होईल. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने किमान 45 जागा जिंकायचा ध्येय भाजपने ठेवले आहे.
यात प्रामुख्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे असलेले मतदारसंघ यांचा समावेश आहे. या मतदारसंघातील तयारीचा आढावा आणि येणाऱ्या काळातल्या योजना यासाठी उद्या विभागीय संघटन मंत्री लोकसभा प्रवासाची जबाबदारी असलेले प्रमुख नेते यांची बैठक होईल.
मुंबई महापालिका निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरवणार आहे. मंत्री आणि कार्यकर्ते यांच्या समन्वयाबद्दलही बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. भाजपच्या बैठकीला देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे गिरीश महाजन रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित असणार आहे.
