Advertisement
मुंबई : कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने पक्ष आक्रमक झाले आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी आंदोलन करत घरावर हल्ला चढवला. यावेळी अब्दुल सत्तारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सत्तारांच्या घरावर दगडफेकही करण्यात आली. यात त्यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण देखील उपस्थित होत्या. दरम्यान, अब्दुल सत्तार यांची 24 तासाच्या आत मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रातून दिला आहे.
