Advertisement
सोलापूर : उजनी मोठा कालवा फुटल्याने पाटकुल येथील
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने जास्तीत जास्त मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी
केली आहे, शेतकऱ्यांच्या या नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्नही उपस्थित करीत
प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई
देण्याबाबत कार्यवाही सुरू करावी. यासाठी मी स्वत: शासनाकडे पाठपुरावा करून
शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देणार आहे, असे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी
सांगितले.
उजनी धरणातून येणारा मोठा उजनी उजवा कालवा 112 कि.मी.चा आहे. रविवारी
(दि.29) पहाटे पाटकुल ओढ्याजवळ हा कालवा फुटल्याने शेतकऱ्यांच्या पिकांसह विहिरींचे
देखील मोठे नुकसान झाले. शेकडो एकर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. पुराची स्थिती
निर्माण झाली आहे. याची पाहणी मोहोळ तालुक्याचे माजी आमदार तथा माजी मंत्री
लक्ष्मणराव ढोबळे यांनी केली. यावेळी पाटकुलचे देशमुख साहेब, नितीन काळे, सुदर्शन
मसुरे यांच्यासह भाजप तसचे बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याबाबत ढोबळे यांनी सांगितले की, पाटकुल येथील
खरात वस्तीजवळ हा प्रकार घडला. उजनी धरणातून उजव्या कालव्यात 500 क्युसेस पाणी
सोडण्यात आल्याने कालवा फुटुन शेतातील डाळिंब, ऊसासह इतर पिके वाहून गेली आहेत.
शेतकऱ्यांच्या घरातही पाणी शिरले आहे. सध्या सर्वत्र पाणीच पाणी आहे, कालव्याचे
पाणी थेट शेतात गेल्यामुळे ऊस, द्राक्ष तसेच इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
विहिरींमध्ये देखील गाळ भरला गेल्याने तसेच विहिरींचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे.
