Advertisement
सिंधुदुर्ग : शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये कोकणात जोरदार राडा झाला आहे. कणकवलीच्या कनेडी गावामध्ये हा वाद झाला आहे. भाजप आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली आहे. माघी गणेश जयंतीच्या पूर्व संध्येला कणकवलीत राजकीय तणाव निर्माण झाला आहे. किरकोळ बाचाबाचीवरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही गट आमने-सामने आल्यानंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या राड्यानंतर कनेडी गावात तणावपूर्ण वातावरण आहे. वाद आणखी वाढू नये म्हणून पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कनेडी गावामध्ये क्यूआरटी, आरसीपी आणि इतर तालुक्यांमधील पोलीस दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्तेही एकत्र जमायला सुरूवात झाली आहे.
