Advertisement
मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सकाळच्या शपथविधीचा सस्पेन्स तीन वर्षांनंतरही कायम आहे. अजित पवारांसोबतचा शपथविधी शरद पवारांशी चर्चा करून झाला होता, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस यांच्या या वक्तव्यावर अजित पवारांनी काहीही बोलण्यास नकार दिला, तर शरद पवारांनी केलेल्या विधानामुळे खळबळ माजली.
आता अजित पवारांनी बोलायची गरज काय? पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? समजेन वाले को इशारा काफी है,' असं सूचक विधान शरद पवारांनी केलं. या वक्तव्याच्या दोनच दिवसांनंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा यावर भाष्य केलं आहे. 'राष्ट्रपती राजवट हटली त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, हे मी मजेत बोललो होतो. फडणवीसांनी माहिती द्यावी, त्याला मी इतके महत्त्व देत नाही. शरद पवारांच्या बोलण्यामुळे राष्ट्रपती राजवट लागते, इतके माझे महत्त्व आहे, चांगलं आहे,' असा टोलाही शरद पवारांनी लगावला.
