#

Advertisement

Friday, February 3, 2023, February 03, 2023 WIB
Last Updated 2023-02-03T09:19:24Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

लक्ष्मणराव ढोबळे यांनी जाहीर केला राजकीय वारसदार?

Advertisement

सोलापूर जिल्ह्यासह मंगळवेढा मतदार संघात रंगली चर्चा


विशेष प्रतिनिधी
सोलापूर : भारतीय जनता पक्षात पाच-सहा वर्षे काढली, पक्षात ज्येष्ठता आहे. आता, माझं वय झालं आहे, आधाराची गरज लागते माणूस सोबत लागतो. आगामी काळात कोणतीही निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी मंगळवेढा शहर विकास आराखड्यात बाधित लोकांच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चात उपविभागीय कार्यालयासमोर मार्गदर्शन करताना केली होती, त्यानंतरच्या काळात कोन्हेरी येथे प्राचार्य सुधीर पुळजे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात ढोबळे यांनी आगामी राजकारणाचे चित्रच स्पष्ट केल्याची चर्चा सध्या सोलापूर जिल्ह्यासह मंगळवेढा मतदार संघात रंगली आहे.
मी संस्थेच्या संसारात रमून गेलो आहे, मस्तवालांना आवर घालण्याची ताकद माझ्या मुलीच्या काळ्या कोटात आहे, हेच माझे वैभव आहे आणि मायबाप जनता आमच्या पाठिशी असल्याने त्या वैभवासाठी कुठल्याही पुढाऱ्याकडे जाऊन मला एखादा महामंडळ द्या, असे म्हणावे लागणार नाही, असे वक्‍तव्य करीत आगामी 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या कन्या ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे याच उमेदवार असतील, असे ढोबळे यांनी स्पष्ट केल्याची चर्चा आहे.
सोलापूरच्या राजकारणात शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असताना त्यानंतरही भाजप प्रवेशानंतर ढोबळे यांनी "लोकनेते' म्हणून स्वतंत्र छाप पाडली आहे. मूळचे अक्कलकोटचे असलेले लक्ष्मण ढोबळे यांनी राजकीय वारसा नसतानादेखील आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. तब्बल 25 वर्षे मंगळवेढ्याचे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले.2004 पर्यंत मंगळवेढ्याचे ते आमदार होते. आजही ते तळागळातील लोकांत मिसळून कार्यरत आहेत. वयोमान आणि पत्नी अनुराधा यांचे निधन झाल्यानंतर माझी अवस्था बशी नसलेल्या कपासारखी झाली असल्याचे तसेच तीन मुलांना ताकद देणे, ही माझी जबाबदारी असल्याचे त्यांनी अनेकदा जाहीरपणे स्पष्ट केले आहे.
मंगळवेढ्याचे नेते माजी मंत्री ढोबळे यांचे मतदार संघातच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यात मोठे योगदान आहे, या घराला मोठा राजकीय वारसा लाभला आहे. आजही ते आणि त्यांचे कुटुंब मातीशी नाळ जोडून आहेत. सामान्यातील सामान्य माणसाच्या घरात या कुटुंबाला स्थान आहे, अशा वेळी लक्ष्मणराव ढोबळे यांचा खरा राजकीय वारसदार कोण? असा प्रश्‍न नेहमीच उपस्थित राहिला आहे.
मतदारसंघातील राजकाणात गेल्या काही वर्षांत ढोबळे यांची भूमिकाही मोठी राहिली आहे. शिक्षण संस्था, सूत गिरणी, साखर कारखाना तसेच बहुजन रयत परिषद या माध्यमातून त्यांनी आपली पकड जिल्हा, मतदार संघासह राज्यभरात समाजावर कायम ठेवली आहे. याच कारणातून त्यांचा राजकीय वारसदार नक्की कोण? याची उत्स्कुता संबंधीत संस्थांसह अवघ्या राज्यभरालाही लागून आहे. परंतु, "शब्दप्रभू' म्हणून सुपरिचीत असलेले प्रा. ढोबळे यांच्या मनात नेमके काय चालले आहे, हे आजपर्यंत समजू शकलेले नाही.
भाजप पक्ष माझा आणि मी पक्षाचा असल्यामुळे पक्षातील कोणताही नेता माझा शब्द खाली पडू देणार नाही, मी माझ्या लेकी-पोरासाठी कोणतही महामंडळ मागू शकलो असतो. सत्तेची चव वेगळी असते, सत्ता गेल्यावर माणसाची अवस्था फार बिकट होते. माझी तशी झालेली नाही. कारण, माझ्यापाठीशी सोन्यासारखी माणसं आहेत, असे सांगतानाच त्यांनी आपली कन्या ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांच्या नावाचा उल्लेख करीत माझ्या मुलीच्या काळ्या कोटात मस्तवालांना आवर घालण्याची ताकद आहे, हेच माझे वैभव असल्याचे तसेच तिच्यासाठी कुठल्याही पुढाऱ्याकडे जाऊन मला एखादा महामंडळ द्या, असे म्हणावे लागणार नाही कारण जनता पाठिशी आहे, असे जाहीरपणे सांगितल्याने त्यांनी आपला राजकीय वारसदार कोण, हे नकळतपणे जाहीर केल्याची चर्चा सध्या मंगळवेढा तसेच सोलापूर जिल्ह्यात जोरदार रंगली आहे.

ऍड. कोमलताई या आईची सावली


माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचे व्यक्‍तीमत्त्व त्यांच्या आई कै. अनुराधा यांच्याप्रमाणे आहे. लहानपणापासूनच त्यांनी वडीलांसह दौरे ते व्यासपीठावर त्यांची उपस्थिती अनेकांनी पाहिलेली आहे. आई प्रमाणेच सामान्यातील सामान्य लोकांत, कुटुंबात मिसळणे तसेच समाजातील माणसांची काळजी घेणे, असे गुण त्यांच्यातही दिसतात. आईच्या निधनानंतर त्या वडीलांचा आधार म्हणून अनेक ठिकाणी पुढे आल्याचे सर्वांनी पाहिले आहे. बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून त्यांनी वडीलांचे कार्य केवळ मतदार संघातच नव्हे तर राज्यभरात सुरू ठेवले आहे. 15 हजार महिलांचा उमंग महिला महोत्सवाचे महिलाराज दृश्‍य न भुतो न भविष्य, असे तालुक्‍याने पाहिले आहे. महिलांची गर्दी कोणत्या महिला आमदार किंवा खासदारांनाही जमवता आलेली नाही. यासह आरोग्य शिबीर, टोल विरोधी आंदोलन, बार्टीतील भ्रष्टाचार आंदोलन, वाढीव वीजबील विरोधी आंदोलन, बचतगट मेळावे असे जनकल्याणाचे उपक्रम त्यांनी शाहू परिवाराच्या सहकार्याने ते यशस्वीपणे राबविले आहेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक जण मुहूर्तावर कामे करतात परंतु, ऍड. कोमलताई यांच्याकडून कामांचा ओघ गेली अनेक वर्षे सातत्योन सुरू आहे, कुठलीही अपेक्षा न ठेवता त्या कार्यरत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. याच काही कारणातून त्यांचे नाव ढोबळे यांचा राजकीय वारसदार म्हणून सातत्याने घेतले जाते.