Advertisement
मुंबई : दिल्ली-बडोदा-मुंबई (डीव्हीएम) या एक्सप्रेस वेचा राजस्थानमधील दौसापर्यंतचा भाग 12 फेब्रुवारीपासून वाहतुकीसाठी खुला करण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे गुरुग्राममधील सोहना ते राजस्थानमधील दौसापर्यंत एक्स्प्रेस वेने प्रवास करता येणार आहे. सध्या या एक्स्प्रेस वेवरून दररोज 25 ते 30 हजार वाहने ये-जा करतील, असा अंदाज आहे. या वाहनांसाठी टोलदेखील निश्चित करण्यात आला आहे.
दिल्ली-बडोदा-मुंबई या एक्सप्रेस वेवर, कारनं प्रवास करत असताना प्रति किलोमीटर 2 रुपये 19 पैसे टोल भरावा लागणार आहे. सोहना येथील एक्स्प्रेस वेच्या एंट्री पॉईंटपासून 12 किलोमीटर अंतरावर टोलनाका उभारण्यात आला आहे. 2 रुपये 19 पैसे या टोल दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) अधिकारी याबाबत सविस्तर बोलण्यास टाळाटाळ करत आहेत. दोन दिवसांनी टोल दर जाहीर होतील, असं त्यांनी सांगितलं आहे. विभागीय सूत्रांवर विश्वास ठेवला तर टोल दर प्रति किलोमीटर 2 रुपये 70 पैसे होऊ शकतो. 'नवभारत टाइम्स'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
