Advertisement
मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही आपल्या जीवाला धोका असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी एका गुंडाला सुपारी दिली, असा गंभीर आरोप केला आहे. याबद्दल त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे.
शिवेसना नेते संजय राऊत यांनी गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात त्यांना त्यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं. ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला मला जीवे मारण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली असल्याचं या पत्रात म्हटलं आहे.
लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे व गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात, तरीही एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे' अशी मागणी राऊत यांनी केली.

