Advertisement
जालना : दोनच दिवसांपूर्वी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. बीआरएसमध्ये प्रवेश करताच त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना आव्हान दिलं आहे. त्यांनी दानवेंच्या विरोधात दंड थोपटले आहेत. पक्षानं संधी दिल्यास आपण विधानसभेची निवडणूक कन्नड मतदारसंघातून संजना जाधव यांच्याविरोधात तर लोकसभा निवडणूक जालना मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांच्याविरोधात लढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता जालना मतदारसंघात रावसाहेब दानवेंविरूद्ध हर्षवर्धन जाधव असा सामना रंगणार का? याकडे सर्वांच लक्ष लागल आहे.
हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वीच चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला आहे. हैदराबादमध्ये चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षात प्रवेश केला. आपन लवकरच छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रशेखर राव यांची सभा घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हर्षवर्धन जाधव हे कन्नडचे माजी आमदार आहेत. त्यांच्या या प्रवेशामुळे छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात.
