Advertisement
सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी नाव चर्चेत ?
मुंबई : सोलापूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या पडद्यामागील अडचणी वाढल्या आहेत. 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जयसिद्धेश्वर महास्वामी निवडून आले होते. परंतु, त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने महास्वामी यांचा विजय सोपा झाला होता. भाजपने सोलापूर मतदार संघ खेचून आणला पण, त्यानंतरही जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या अडचणी वाढल्या होत्या. सोलापूर लोकसभा मतदार संघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. निवडणूक लढवताना जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी दाखल केलेला बेडा जंगम जातीचा दाखला बनावट असल्याचे सांगत जातपडताळणी समितीने तो रद्दही केला होता, त्यानंतर अक्कलकोटचे तहसिलदार संतोष शिरसाठ यांनी न्यायालयात फिर्याद दाखल केल्याने हे प्रकरण वाढले होते. याचा त्रास भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना त्यावेळी चांगलाच झाला होता. त्यामुळे यावेळी भाजपकडून सोलापुरात लोकसभेचा उमेदवार देण्यात काही चूक होणार नाही, अशी काळजी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापुरात गेल्या पंचवार्षिंकमध्ये माजीमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचे नाव सातत्याने पुढे येत आहे. ढोबळे यांच्या गेल्या वर्षभरात किमान चार ते पाच वेळा दिल्ली वाऱ्या झाल्या आहेत, याशिवाय राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीही होत आहेत. मुंबईत भाजपच्या होणाऱ्या बैठकांना ढोबळे यांना तातडीने निरोप आल्याने अनेक वेळा ते रात्री-अपरात्री दिल्ली-मुंबईला रवाना झाल्याचे सामोर येत आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात ढोबळे यांनी आपला विधानसभा मतदार संघासह सोलापूर लोकसभा मतदार संघावर भाजपची पकड मजबूत करण्यासाठी सातत्याने पदाधिकारी, कार्यकर्ते अगदी सामान्य जनतेशी संपर्क ठेवला आणि वाढवला आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनी कधीही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे कोणत्याही मोठ्या पदाची मागणी केलेली नाही. याउलट पक्षासाठी काम करीत राहिले आहेत.याच काळात सोलापूर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दावा केल्याने त्याला प्रत्युत्तर म्हणून माजी खासदार सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी थेट कोण रोहित पवार? असा उल्लेख करीत यावेळी कॉंग्रेसकडून सुशीलकुमार रिंगणात उतरण्यास इच्छुक असल्याचे नकळतपणे जाहीर केले. परंतु, असे वक्तव्य करताना ज्या शरद पवार आणि पवार कुटुंबामुळे ते राजकारणात स्थिरावले, खासदार, मंत्रीपदापर्यंत गेले त्यांचा विसर प्रणिती शिंदे यांना पडल्याबाबत आमदार रोहित पवार यांनीही नाराजी व्यक्त केली होती. याउलट माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे शरद पवार यांचे शिष्य मानले जातात. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कधीही पवार यांच्या तसेच त्यांच्या कुटुुंबातील व्यक्तीवर टीका केलेली नाही. यामुळे भाजपकडून जर खासदारकीला लक्ष्मणराव ढोबळे निवडणूक रिंगणात उतरले तर राष्ट्रवादीची रसद नकळतपणे ढोबळे यांच्या पारड्यात पडू शकते, त्यातच ढोबळे हे अनुसुचित जातीमधील लोकनेते म्हणून सुपरिचीत आहेत. त्यामुळे एक भक्कम उमेदवार म्हणून सोलापूर लोकसभेसाठी ढोबळे यांचे नाव निश्चितच पुढे येऊ शकते. तर, सध्या सुरू असलेल्या दिल्ली, मुंबईच्या वाऱ्या, गुप्त बैठका यातून पडद्यामागच्या हालचाली वाढल्या आहेत, अशीच चर्चा सध्या सोलापूरात रंगू लागली आहे.
