Advertisement
पुणे : बालकांच्या मोफत
व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के आरक्षित जागांसाठी
आजपासून (दि.1) ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी "आरटीई' पोर्टलवर सुविधाही
उपलब्ध करून देण्यात आली आहे. "आरटीई' अंतर्गत प्रवेश निश्चित झाल्यानंतर संबंधित
बालकांचे आधारकार्ड 90 दिवसांच्या आत शाळेकडे सादर करणे बंधनकारक आहे. आधार कार्ड
सादर केले नाही तर प्रवेश रद्द करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात
आले.
वंचित घटकातील बालकांच्या प्रवेशाकरीता वार्षिक कमाल उत्पन्नाची मर्यादा
लागू नाही. आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे, अशा
पालकांच्या बालकांचा समावेश आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो. कोरोना
प्रादुर्भावाने बालकांच्या एक किंवा दोन्ही पालकांचे दि. 1 एप्रिल 2020 ते दि. 31
मार्च 2022 या कालावधीत निधन झालेले असल्यास संबंधित बालकांना वंचित गटातून आवश्यक
कागदपत्रे सादर करून प्रवेश घेता येणार आहे. आजपासून (बुधवार, दि.1) दुपारी तीन
वाजल्यापासून प्रवेश अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून दि. 17 मार्चपर्यंत ही सुविधा
सुरू राहणार आहे, प्रवेशासाठी संकेतस्थळ https://student.maharashtra gov.in यासाठी
येथे ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
