Advertisement
मुंबई : उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमृता फडणवीस यांनी यासंदर्भात तक्रार दिल्यानंतर डिझायनर असलेल्या अनिक्षा नावाच्या महिलेविरोधात आणि तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. देवेंद्र फडणीस यांनी याबाबत विधानसभेत याबाबत या कहाणीचा खुलासा केल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर आता अनिक्षा नावाच्या महिलेला मलबार हिल पोलिसांनी उल्हासनगर येथून ताब्यात घेतले आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत या प्रकरणाबाबत प्रश्न मागताच देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले. देवेंद्र फडणवीस यांच्या माहितीनंतर मलबार हिल पोलिसांचे पथक उल्हासनगरमध्ये दाखल झाले होते. विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी अनिल जयसिंघानिया नावाच्या व्यक्तीचे नाव घेतले होते. पोलिसांनी अनिल जयसिंघानिया यांच्या घरी पोहोचत त्यांच्या घराची झाडाझडती सुरु केली. यानंतर पोलिसांनी अनिक्षाला ताब्यात घेतले. मलबार हिल पोलिसांनी उल्हासनगर मध्ये दाखल होताच विविध ठिकाणी झाडाझडती सुरु केली आहे. पोलिसांनी जयसिंघानीयांच्या कुटुंबीयांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
