Advertisement
मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण सापडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झालेय. याबाबत त्यांनी ही माहिती दिली. काल सोमवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
छगन भुजबळ हे काल येवल्याहून नाशिक जात होते. यावेळी त्यांना बरे वाटत नव्हते. अचानक त्यांची प्रकृती बिघडली.त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांची कोरोनाची टेस्ट करण्यात आली होती. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली. आता त्यांची प्रकृती स्थिर असून ते नाशिक येथील घरी विश्रांती घेत आहेत. आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती त्यांनी समाजमाध्यमातून दिली. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना टेस्ट करुन घ्यावी, आपल्याला काही लक्षणे आढळून आल्यास ताबडतोब कोरोना चाचणी करुन घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे.
