Advertisement
बीड : संत भगवान बाबा यांच्या फिरत्या नारळी सप्ताहात भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात मनोमिलन झालेले पाहायला मिळाले. यामुळे बहीण भावातील संघर्षाची दरी कमी झाल्याची व्यासपीठवरुन दोघांनी घोषणा केली. सत्ता संघर्षावरून अनेक वर्षापासून सुरू असलेल्या मुंडे बहिण भावाचा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. मात्र, याच संघर्षाला भगवान गडाच्या पायथ्याशी भारजवाडी गावात नारळी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी पूर्णविराम झाल्याची कबुली दोघा बहीण भावाने दिली.
याप्रसंगी पंकजा मुंडे यांनी बोलताना माझा भाऊ मोठा झाला असेल तर मला आनंदच आहे, असं म्हणून या संघर्षाला पूर्णविराम देण्याची सुरुवात केली. यावेळी उपस्थित जनसमुदायाने टाळ्या वाजवून सादही दिली. धनंजय नंतर चार वर्षांनी माझा जन्म झाला. त्याचं काहीतरी कारण असेल. कुळाचा उद्धार करण्यासाठी एकाला दोन असतील तर काय झालं दोघेही आम्ही पराक्रमी आहोत. त्याचा पराक्रम माझा पराक्रम वेगळा, त्याचा पक्ष वेगळा माझा पक्ष वेगळा आहे. दोघं एकाच पाठीवरती जन्माला आलो. आमचे भविष्य काही वेगळं असेल. त्यासाठी काही वेळा वाट पाहा, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी बहिण भावाच्या एकत्रिकरणाचा नवा संकेत दिला आहे.
पंकजा मुंडे यांच्या भाषणानंतर धनंजय मुंडे उभा राहिले. या मनोमिलनाची री पुढे ओढत. भारजवाडीला भारगजवाडी असा उल्लेख मी मुद्दामून केला असं म्हणत धनंजय मुंडे यांनी आमच्या दोघा बहिण भावाच्या नात्यांमधील काही गज का होईना अंतर या नारळी सप्ताहात कमी झालं अशी कबुली दिली. आम्ही दोघे वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या विचाराने काम करतो. विचारांमध्ये भलेही कोसवांतर दूर असली तरी चालेल वर घरामधल्या संवादामध्ये एक तसूभर सुद्धा अंतर नसले पाहिजे. ते अंतर कमी झालं. मुंडे कुटुंबातील गडाच्या भक्ती संदर्भात कोणीही संशय घेण्याचं कारण नाही, असं म्हणत गडाच्या वादावर पूर्णविराम दिला.
