Advertisement
मुख्यमंत्र्यांना पत्रकारांच्या प्रश्नी दै. दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे यांनी दिले निवेदन
ठाणे : महाराष्ट्र शासनाने अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना दिलेल्या
सुविधा या कुचकामी ठरत आहेत. या सुविधांचा लाभ राज्यातील प्रत्येक अधिस्वीकृतीधारक
पत्रकारांना मिळावा, याप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे. संबंधित विभागाला
योग्य त्या सूचना देऊन अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना न्याय द्यावा, अशी मागणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दै. दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे
यांनी निवेदनाद्वारे केली. ठाणे येथे एका कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी
मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी ही भेट घडवून आणली. मुख्यमंत्री शिंदे यांनी सदर
निवेदन स्विकारून अधिस्वीकृतीधारक पत्रकारांचे प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन
दिले.
महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचनालय कार्यालयाकडे राज्यातील
अनेक अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले आहे. परंतु,
हे स्मार्ट कार्ड कुचकामी ठरत असल्याची तक्रार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांनी पत्रकारांना टोलमाफीबाबत घोषणा करूनही जाणुन बुजून पत्रकारांची अडवणूक केली
जाते. अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाही ताटकळत ठेवले जाते. शासकिय विश्रामगृहात
गेल्यानंतर अनेक कारणे सांगितली जातात. विशेषतः विश्रामगृह बुकींग आहे, असे तोंडी
सांगून परत पाठविले जाते. म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेचा लाभ ग्रामीण भागातील
अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना मिळविण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागत आहे.
अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना पेन्शनचा लाभ घेण्यासाठी किमान 30 वर्षे पत्रकारितेतील
अनुभवाची अट असून ती कमी करून 25 वर्षे करावी, अशा मागण्या निवेदनाव्दारे
मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.
यावेळी खासदा श्रीकांत
शिंदे, माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, तात्यासाहेब चव्हाण, दत्तात्रय घाडगे,
विजय ठेंगील, समाधान वाघमारे, गणेश कांबळे, संतोष सकट आदी उपस्थित होते.
