Advertisement
पुणे : शरद पवारांचा भाजपबाबतचा नूर अचानक पालटलाय, अजित पवार देखील नरमाईची भूमिका घेत आहेत भाजप आणि राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? नेमकं कोण कोणाला डोळे मारतंय, असा प्रश्न भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारला असता, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, माझं कोणाच्याही डोळ्याकडं लक्ष नाही. पुढच्या दीड वर्षात अनेक जण गळून पडतील. भाजपसोबत लढण ही सोपी गोष्ट नाही. खुद्द शरद पवार यांनी बाजू घेतली आणखी काय बोलणार.
अदानी प्रकरणात जेपीसी नियुक्त करा अशी मागणी विरोधकांनी केली होती. काँग्रेस या विषयावर अधिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. मात्र अचानक शरद पवार यांनी जेपीसीची आवश्यकता नसल्याचं वक्तव्य केलं. या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उचंवल्या. दरम्यान याबाबत भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांना टोला लगावला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधला आहे. सर्व विरोधी पक्षांना आव्हान आहे की त्यांनी मुद्द्यावर लढले पाहिजे, अजित पवार यांना जे कळले ते बाकीच्यांना कधी कळणार असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मविआ निवडणुका एकत्र लढेल की नाही याबाबत शंका आहे. ते एकत्र लढले तरी आम्हाला फायदा आहे, आणि ते वेगवेगळे लढले तरी भाजपला फायदा असल्याचंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
