Advertisement
पुणे : ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेब चांदेरे यांच्यासह अनेकजण शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यापूर्वी रमेश कोंडे यांनी ठाकरे गटाची साथ सोडून एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता चांदेरे हे देखील शिंदे गटात प्रवेश करणार असल्यानं हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे हे भोर विधानसभा लढण्यासाठी इच्छूक आहेत. मात्र महाविकास आघाडी विधानसभा निवडणूक एकत्र लढल्यास हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला जातो. त्यामुळे बाळासाहेब चांदेरे हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. चांदेरे यांच्यासोबतच भोर वेल्हा मुळशी भागातील अनेक जण ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ते आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
