Advertisement
भाजप प्रांतिक कार्यकारीणी सदस्य तथा माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांचे तानाजी सावंत यांना निवेदन
मंगळवेढा : ग्रामीण रुग्णालयातील असुविधांसह वैद्यकीय अधीक्षक अरविंद गिराम यांची अनुपस्थितीबाबत खरडपट्टी काढत कारभारात सुधारणा करा अन्यथा महिलांकडून चोप देवू, असा इशारा देऊन भाजप प्रांतिक कार्यकारीणी सदस्य तथा माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी थेट आरोग्य मंत्र्यांचे दालन गाठत त्यांना रुग्णालयातील अधिकाऱ्यांचा कारभार, असुविधा आणि गरजा याबाबत निवेदन देत या प्रकरणी लक्ष देण्याची विनंती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य संचालक, आरोग्य मुख्य सचिव, सिव्हील सर्जन, सोलापूर आदिंनाही पाठवण्यात आलेल्या आहेत.
माजी मंत्री प्रा. लक्ष्णराव ढोबळे यांनी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयातील असुविधेबाबत आरोग्य मंत्री सावंत यांना निवेदन दिले आहे. शौचालय, स्वच्छतागृह याची साफसफाई अभावी झालेली दुरवस्था तसेच पाण्याचा तुटवडा याबाबत ढोबळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आपण चांगलं काम करताय. परंतु आपल्या कामाच्या वेगाला कर्मचाऱ्याची साथ हवी आहे तशी अधिक्षीकाची मदत हवी आहे.
मंगळवेढ्यात गरीब समाज आहे, दुबळा समाज आहे ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला साठेनगर आहे, दुसऱ्या बाजूला भीमनगर आहे. समोरच्या बाजूला चर्मकार वस्ती आहे. या दुबळ्या समाजाला आधार मिळावा ही आपणाकडून अपेक्षा आहे. नगरसेविका द्रोपदी कांबळे या महिलेला दवाखान्यात वरिष्ठांकडे मागण्यासाठी पत्र गेल्या असता वैद्यकीय अधिक्षक हजर नव्हते, अशा परिस्थिती या अधिकाऱ्याकडे चांगला अधिकारी म्हणून सांगोल्याचाही चार्ज दिला आहे. आठवडाभरात मंगळवेढ्यास म्हणतोय सांगोल्याला गेलो, सांगोल्याला मंगळवेढ्याला गेलो. तो अधिक्षक पंढरपूरात खासगी दवाखान्यात प्रॅक्टीस करत आहे. 90 हजार पगार असून देखील कामाकडे दुर्लक्ष करत आहे.
रूग्णालयातील वर्ग चारची सेवकाची पद चार वर्षापासून रिक्त आहेत. सगळाच सावळा गोंधळ आहे. एकंदरीत एवढी वाईट अवस्था प्रशासनाची असून देखील कर्मचारी वर्ग मात्र चांगला असून वर्ग दोन चे अधिकारी अतिशय चांगली सेवा देत आहेत. परंतु सातपैकी तीन शिपाई कायमचे गैरहजर असल्यामुळे तोंड धुवायला देखील गरीबांना पाणी मिळत नाही. पत्र न्यायला तीन हेलपाटे घातले. मी एकदा माजी नगरसेविका द्रोपदी कांबळे यांच्या बरोबर गेलो. मल्हारी कांबळे माझ्या बरोबर होते तरी हा माजोरी अधिकारी वीस मिनीटांच्या प्रवासावर पंढरपूरात राहतो. परंतु ग्रामीण रुग्णालयाचा प्रमुख डॉक्टर असल्यामुळे तो स्वत:च आठ-आठ दिवस येत नाही. रोजच्या कामकाजाचे कागदपत्र संध्याकाळी सहीला जातात. सफाई कामगारासारखे फाटकात उभे राहून कागद आत पाठवले जातात. सही करून कागद बाहेर फाटकात येतात. कर्मचारी कागद घेऊन टपाल शिपायासारखा मंगळवेढ्याला येतो, या कारभारावर कोणाचेही नियंत्रण नाही.
मंगळवेढा शहरात चांगली सुस्थितीत असलेली खासगी वीस दवाखाने आहेत. उत्तम चालतात. पूर्ण हॉस्पिटॅलिटी आहे. तरीदेखील ग्रामीण रुग्णालयातच गरीब माणसं गर्दी का करतात? तर सेवा चांगली आहे. परंतु, आज बुधवारी (दि.19) सकाळी दहा वाजता ओपीडी सुरु झालेली नव्हती. वैद्यकीय अधिक्षकच गैरहजर असल्यामुळे आरोगंट असल्यामुळे वेळेवर ओपीडी सुरु होतच नसल्याचे समजले, याची आपण दखल घ्यावी. कारवाई करणं शक्य नसलं तरी ताकीद द्यावी. गरीबांना चांगली सेवा मिळावी ही आरोग्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे, असे प्रा. ढोबळे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
