Advertisement
मंगळवेढा ग्रामीण रुग्णलयातील अनुपस्थिती, असुविधांबाबत काढली खरडपट्टी- सुधारला नाहीत तर महिलांकडून चोप देण्याचा इशारा
मंगळवेढा : येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अरविंद गिराम यांची मागील 15 दिवसांपासून असलेली अनुपस्थिती, रुग्णालयातील असुविधा, अस्वछता याबाबत माजी पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी कार्यकर्त्या समोरच अधीक्षक गिराम यांची खरडपट्टी काढली.
महिनाभरात कारभारात सुधारणा करा अन्यथा महिलांकडून चोप देवू, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. याशिवाय येथील चौकात अरविंद गिराम 15 दिवसांपासून गायब, वट भरणासाठी जाऊन येतो म्हणून गेला तो 15 दिवस गायब. स्वागतोत्सुक लक्ष्मण ढोबळे अशा प्रकारचा फ्लेक्स लावून प्राध्यापक ढोबळे यांनी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षकाचा कारभारच चव्हाट्यावर मांडला.
महाराष्ट्र राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी कार्यशैली सर्वजन ओळखून आहेत. आमदार, मंत्री यातून शासकीय यंत्रणेवर मजबूत पकड असलेले प्रा. ढोबळे यांचा नाद अजूनही कोणी करीत नाही. शासकीय अधिकारी कामात हलगर्जीपणा करत असेल तर त्याला सरळ कसे करायचे, याचा आणखी एक नमुना प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी नुकताच दाखवला. मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम हे सतत अनुपस्थित असतात. यासह रुग्णांची होणारी गैरसोय, रुग्णालयात वाढलेली अस्वछता, घाणीचे साम्राज्य, अशा वाढत्या तक्रारीमुळे ढोबळे यांनी अचानकपणे बुधवारी (दि.19) कार्यकर्त्यांसमवेत सकाळी 10 वाजताच ग्रामीण रुग्णालयात गाठले. त्यावेळी ओपीडी बंद होती. गीराम गैरहजर होते. तर रूग्ण डॉक्टर, कर्मचाऱ्यांची वाट पाहत बसले होते. हा अनागोंदी कारभार पाहून ढोबळे संतापले. वैद्यकी अधीक्षकांची वाट पाहत थांबले असता तासाभराने गिराम आल्यानंतर प्रा. ढोबळे यांनी गीराम यांची चांगलीच हजेरी घेत खरडपट्टी काढली. शासनाचा 90 हजार पगार घेऊन शासनालाच चुना लावत का? कारभार सुधारा अन्यथा..., यावेळी संतप्त कार्यकर्त्यांना ढोबळे यांनी आवरले.
- दोन महिन्यापूर्वीच भरले पद
मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांच्या दुर्लक्षतेमुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. शासनाचा पगार घेऊन खासगी व्यवसाय करीत असून येथे गैरहजर रहात असतात. तसेच येथील रुग्णांची होत असलेली हेळसांड, सोईसुविधाचा अभाव अस्वछता, अधिकारी व कर्मचारी यांचा उद्दामपणा यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहेत. शासन आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीने देत असताना केवळ एखाद्या दुसऱ्या मस्तवाल अधिकाऱ्यामुळे रुग्णांना चांगली सेवा मिळत नाही. यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना भेटणार असून तालुक्यातील ढेपाळलेली आरोग्य सेवा, सिजरसाठी जादा पैसे घेऊन रुग्णाची होणारी लूट आदी प्रश्नांबाबत निवेदन देणार आहे.
- प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य
