Advertisement
भोर : महाराष्ट्र परिवहन सेवेतील एसटी बस अचानक बंद पडल्याने रस्त्यावर अडकून पडलेल्या प्रवाशांना शनिवारी बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मदत केली. सुप्रिया सुळेंचा ताफा भोर तालुक्यातील दौऱ्यावर जात असताना त्यांना रस्त्यात एक शिवशाही बंद पडल्याचं दिसलं. यानंतर त्यांनी तातडीने आपला ताफा थांबवला आणि या प्रवाशांची चौकशी केली. भरदुपारी ही बस मध्येच बंद पडल्याने अनेक प्रवाशी उन्हात ताटकाळत उभे होते. सुप्रिया सुळेंनी या सर्व प्रवाशांना दुसऱ्या बसने पाठवण्यासंदर्भातील व्यवस्था केली. इतकेच नाही तर काही प्रवाशांना त्यांनी स्वत:च्या ताफ्यातील गाड्यांमधून खेड शिवापूर टोलनाक्यापर्यंत सोडलं. तसेच आपल्या ताफ्यातील सुरक्षारक्षकांना आणि पोलिसांना या प्रवाशांची जाण्याची सोय होईपर्यंत त्यांच्यासोबतच थांबावे असे निर्देश देऊन प्रवाशांची सोय करुन दिल्यानंतर सुप्रिया सुळे पुढील दौऱ्यासाठी रवाना झाल्या.
यासंदर्भातील पोस्ट सुप्रिया सुळेंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन केली आहे. "आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्याच्या दाैऱ्यावर जात असताना वाटेत शिवशाही बस बिघाड झाल्याने थांबल्याचे दिसले. गाडी नादुरुस्त झाल्याने प्रवासी पर्यायी वाहनाची वाट पाहत तिथंच उन्हात थांबले होते. यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश होता. उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने हे प्रवासी आणि लहान मुलांना होणारा त्रास कमी करण्यासाठी काही जणांना दुसऱ्या बसमधून खेड शिवापूरमधील टोल नाक्यावर सोडण्याची विनंती केली," असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
