Advertisement
पुणे : पुणे विद्यापीठाच्या एका परिपत्रकामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळाचं वातावरण निर्माण झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं नॅक नसलेल्या कॉलेजात प्रथम वर्षासाठी प्रवेशासाठी बंदी घातली आहे. कुलसचिवांनी याबाबत परिपत्रक काढले आहे. आतापर्यंत ज्या कॉलेजेसनी नॅक मूल्यांकन किंवा एन बी ए मानांकनासाठी अर्ज सादर केलेले नाही त्यांनी शैक्षणिक वर्ष 2023-2024 मध्ये फस्टईयरचे प्रवेश विद्यापीठाच्या परवानगीशिवाय करू नये. विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी कॉलेज किंवा संस्थेची असेल असं या परिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेजसह टेक्निकल अभ्यासक्रमांच्या प्रवेशात संभ्रमाचं वातावरण निर्माण झाले आहे.
दहावी आणि बारावीच्या लेखी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी, बारावीच्या लेखी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीची पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान तर बारावीची पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान होईल. बारावीची व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा 18 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. दहावी, बारावीच्या निकालात मिळालेल्या गुणांवर जे विद्यार्थी समाधानी नसतील त्यांना ही पुरवणी परीक्षा देता येईल. तसेच जे विद्यार्थी नापास झाले आहेत अशांनाही पुन्हा परीक्षेची संधी मिळणार आहे.
