Advertisement
मुंबई : लोकसभा, विधानससभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला सर्वच पक्षांनी सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी विरोधकांची महत्त्वाची बैठक पाटण्यामध्ये पार पडली. या बैठकीनंतर आता भाजप देखील अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी युतीमधील सर्व मित्रपक्षांची एक बैठक बोलावली आहे.
येत्या सोमवारी मुंबईत भाजप आणि मित्रपक्षांची ही बैठक पार पडणार आहे. 2014 आणि 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत असलेल्या सर्व घटकपक्षातील प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून ही बैठक बोलावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीमध्ये निवडणुकांच्या रणनितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
