Advertisement
पुणे : राज्याच्या विकासासाठी आम्ही भाजपसोबत हातमिळवणी केली आहे, असं अजित पवार गटाकडून वारंवार सांगितलं जात आहे. तर, शरद पवार गटाकडून पक्षातील फुटीच्या कारणावर मौन पाळण्यात आलं आहे. शरद पवार यांनीही पक्षात फूट का पडली याचं कारण स्पष्ट केलेलं नाही. मात्र, ईडीच्या कारवायांच्या धाकानेच अजित पवार गट भाजपसोबत गेल्याचं बोललं जात आहे. त्यावर आज शरद पवार यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. ईडीच्या कारवायांमुळे आमचे लोक भाजपसोबत गेल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. जयंत पाटील यांच्याबाबतही तोच प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.
जयंत पाटील यांच्या भावाला नोटीस आल्याचं कानावर आलं आहे. सत्तेचा गैरवापर करून पावलं टाकली जात आहे. आमच्या काही सहकाऱ्यांना नोटीसा आल्या म्हणून ते भाजपमध्ये गेले. तोच प्रयत्न जयंत पाटील यांच्याबाबत घडत आहे. पण जयंत पाटील आपल्या विचारांवर ठाम राहतील असं सांगतानाच कालच्या बैठकीत ईडीच्या कारवायांवर चर्चा झाली नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
