Advertisement
मुंबई : मंत्रालयात आज अचानक मोठा गोंधळ उडाला. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या आवारात पहिल्या माळ्यावर जाळी लावण्यात आली आहे. कुणीही उडी मारुन आत्महत्या करु नये, सुरक्षेच्या कारणास्त जाळी बांधण्यात आली आहे. याच जाळीवर उडी मारुन अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी आंदोलन केले. आपल्या मागण्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी आज थेट मंत्रालय गाठलं आणि जाळीवर उतरून आंदोलन पुकारलं.
अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी येथे अप्पर वर्धा धरण आहे. या धरण परिसरातील धरणग्रस्तांकडून आज थेट मंत्रालयात आंदोलन करण्यात आलं. या धरणग्रस्तांचं गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. गेल्या 103 दिवसांपासून मोर्शीच्या तहसील कार्यालयासमोर या सर्व धरणग्रस्तांचं आंदोलन सुरु आहे. पण त्यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी आज थेट मंत्रालयात आगळ्यावेगळ्या पद्धतीचं आंदोलन सुरु केलं. विशेष म्हणजे मंत्रालयात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित आहेत. ते विविध बैठका आणि आपल्या कामांमध्ये व्यस्त आहेत. असं असताना आज मंत्रालयात अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी अनोख्या पद्धतीने आंदोन पुकारलं.
