Advertisement
मुंबई : मागच्या आठवड्यात ठाण्यातील कळवा येथील रुग्णालयात एकाच दिवसात 18 रुग्णांचा मृत्यू झाला. तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे? असा सवाल मंत्र्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला. त्यावर शिंदे यांनी उत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांनी सर्व परिस्थिती समजावून सांगितली. वादाची ठिणगी पडल्याचं लक्षात येताच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करुन हा विषय थांबल्याच सूत्रांनी सांगितलं.
आता याच मुद्यावरुन शिंदे गटात अस्वस्थता पसरल्याची माहिती आहे. अजितदादांना वेळीच आवरावे, अशी मागणी शिंदे यांचे निकटवर्तीय भाजपच्या नेत्यांकडे करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी राष्ट्रवादीला सरकारमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. कृषीसह काही महत्त्वाची खाती शिंदे गटाला गमवावी लागल्याने मंत्र्यांमध्ये प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. अजित पवार यांनी थेट सवाल केल्याने शिंदे यांना ते फारसे रुचले नसल्याची चर्चा शिंदे गटात आहे. अशा वेळी भाजपनेते आणि विशेषत: फडणवीस यांची भूमिका काय असेल याकडे शिंदे गटाचे लक्ष आहे.
