Advertisement
बहुजन रयत परिषदेचे प्रदेश सचिव ईश्वर क्षिरसागर यांची टीका
सोलापूर : शहरातील मटका, जुगार अड्डे "शिंदेशाही"पासून सुरू आहेत. एवढी वर्ष शहर, जिल्ह्याच्या राजकारणात, सत्तेत राहूनही शहराच्या रोजगार, उद्योग व्यवसाय, शिक्षण, आरोग्य व दळणवळण या संदर्भात कोणतेही भरीव काम करता आले नाही, अशा काँग्रेसचे बोलघेवडे आता बहुजन रयत परिषदेने अवैध धंद्याविरोधात आवाज उठवत असताना पुरावे मागत भाजपचे नाव घेत त्याला राजकीय वळण देण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. ज्यांच्याकडे पुरावे द्यायचे त्यांच्याकडे आम्ही देऊच. पण, काँग्रेसला आता भाजप विरोधात बोलायला आमचा आधार घ्यावा लागतो, ही बाब आमचे मोठेपण सिद्ध करते. या प्रश्नाबाबत प्रदेशाध्यक्षा ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे प्रयत्न करीत असताना त्यांना साथ देण्याऐवजी राजकीय विरोध केला जात आहे. यावरून काँग्रेसची नितिमत्ता लक्षात येते, अशी टीका ही बहुजन रयत परिषदेचे प्रदेश सचिव ईश्वर क्षिरसागर यांनी केली आहे.
सोलापुरातील मटका, जुगार, डान्सबार, दारू विक्री अशा अवैध धंदे विरोधात बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. कोमलताई साळुंखे - ढोबळे यांनी आवाज उठवीत थेट पोलिस आयुक्तांच्या कामकाजावर आरोप केले आहेत, अशा वेळी आयुक्तांची पाठराखण करण्याची जबाबदारी काँग्रेसने प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांच्यावर सोपवली आहे, याच कारणातून सर्वांना ज्ञात असलेल्या गोष्टींचे पुरावे मागत भाजप ला घरचा आहेर, दिल्याची पोकळ टीका कुलकर्णी करीत असल्याचे क्षिरसागर यांनी म्हंटले आहे.
मुळात मटका, जुगार अवैध धंदे हा प्रश्न बहुजन रयत परिषदेने समोर आणला असून याबाबत जाहीर पत्रकार परिषद घेत, आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करवाई करण्याबाबतचे निवेदन आणि पुरावे देणार आहोत, असे स्पष्ट केलेले असताना, पुरावे सादर करा, भाजपला घरचा आहेर अशी बोंब मारत याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सांगून ईश्वर क्षिरसागर म्हणाले की, सोलापूर शहराचा वैभवशाली इतिहास धुळीस मिळवण्यात सक्रिय राहणाऱ्या प्रस्थापित राजकारण्यांनी सामाजिक प्रश्नांचे भान ठेवावे. राज्यात काम करणाऱ्या बहुजन रयत परिषदेने उपस्थित केलेल्या प्रश्नावर गृहमंत्री नक्कीच करवाई करतील. मात्र, याचे श्रेय भाजपला मिळू नये, बसवलेली "घडी"तशीच चालू राहावी म्हणून काँग्रेस या प्रश्नात तोंड घालत आहे. साथ देणं लांब पण राजकीय वळण देऊन स्वतःच्या प्रसिद्धीसाठी बोलण्यापेक्षा काँग्रेसने आता घरजावायाच्या भूमिकेतून बाहेर आलं पाहिजे, असा सल्ला ही ईश्वर क्षिरसागर यांनी काँग्रेसला दिला आहे.