Advertisement
मुंबई : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर काही आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले. तर काही आमदार शरद पवार यांच्यासोबत राहिले. दोन्ही गटाने आपलाच पक्ष मूळ असल्याचा दावा केला आहे. आपल्याकडेच पक्षाची दावेदारी असल्याचंही म्हटलं आहे. त्यासाठी दोन्ही गटाने निवडणूक आयोगात धावही घेतली आहे. तर अजित पवार गटाच्या विधान परिषदेतीला पाच आमदारांवर कारवाई करण्यासाठी शरद पवार गटाने विधानस परिषदेच्या उपसभापतींकडे धाव घेतली आहे. त्यामुळे या आमदारांच्या पात्र-अपात्रतेवर लवकरच कार्यवाही सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजितदादा गटाचे विधान परिषदेतील आमदार सतीश चव्हाण, अमोल मिटकरी, विक्रम काळे आणि अनिकेत तटकरे यांच्याविरोधात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे तक्रार केली होती. तर जितेंद्र आव्हाड यांनी विधान परिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. या आमदारांनी बाजू मांडावी म्हणून त्यांना नीलम गोऱ्हे यांच्याकडून पुढील आठवड्यात त्यांना नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे हे सर्वच्या सर्व पाचही आमदार अजितदादा गटाचे आहेत.
