Advertisement
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. कारण आमदार अपात्रतेच्या प्रकरणाच्या सुनावणीचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या विरोधात असणार आहे. संविधानानुसार विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागेल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर येत्या 31 डिसेंबरला याबाबत निकाल जाहीर करणार असल्याची माहिती होती. पण कोर्टात आज काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं राजकीय भवितव्य आता 10 जानेवारीला ठरणार आहे.
सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी घेण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. त्यानुसार राहुल नार्वेकर सुनावणी घेत होते. या प्रकरणी दोन्ही बाजूने जवळपास युक्तिवाद पूर्ण झालाय. आता सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. असं असताना राहुल नार्वेकर यांनी पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेत तीन आठवड्यांची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी केली.शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल 20 डिसेंबरला राखून ठेवला जाईल. पण मला 2 लाखांपेक्षा जास्त कागदपत्रे आले आहेत. ते वाचावे लागतील. तसेच जजमेंट लिहावं लागेल. यासाठी तीन आठवड्यांचा वेळ वाढवून द्या, असं विधानसभा अध्यक्षांनी आपल्या अर्जात म्हटलं होतं. कोर्टाने त्यांची ही मागणी काही अंशी मान्य केली. कोर्टाने तीन आठवड्यांची वेळ वाढवून दिली नाही. पण 10 दिवसांची मुदतवाढ नक्कीच दिली. त्यामुळे राहुल नार्वेकर यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
या सगळ्या प्रकरणानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे यांचं संपूर्ण भवितव्य या सुनावणीच्या निकालावर अवलंबून आहे. हा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तर उद्धव ठाकरे यांचं मोठं नुकसान होणार आहे. पण हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर एकनाथ शिंदे यांचं सर्वात मोठं नुकसान आहे. या निकालामुळे एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाऊ शकतं. त्यामुळे येत्या 10 जानेवारीला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर राहणार की जाणार? हे स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हा दिवस खूप मोठा आणि मौल्यवान आहे.
