Advertisement
दिल्ली : कोविड-19 चा धोका भारतात पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. रविवार, देशात सुमारे 335 नवीन कोविड बाधितांची प्रकरणे नोंदवण्यात आल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे आता देशभरातील एकूण बाधितांची संख्या 1701 झाली आहे. खळबळजनक बाब म्हणजे कोविड-19 मुळे पाच लोकांचा मृत्यूही झाला आहे. यापैकी चार केरळचे आणि एक उत्तर प्रदेशातील होते. त्यानंतर आता कर्नाटक सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. कोरोनाचा नवीन प्रकार जेएन-1 केरळमध्ये आल्याने देशातील सर्व राज्यांनी आरोग्य व्यवस्थेसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. केरळमध्ये कोरोनाचा सर्वात प्राणघातक प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यातून धडा घेत कर्नाटक सरकारने महत्त्वाची नियमावली जारी केली आहे. आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्यांनी मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.
देशात हिवाळ्यासह कोरोनाचे जोरदार पुनरागमन झाल्याने केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, रविवारी कोरोनाचे 335 नवीन रुग्ण आढळले आहेत. तसेच, उत्तर प्रदेशमध्ये एक आणि केरळमध्ये चार मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनाचे सक्रिय रुग्ण 1700 हून अधिक झाले आहेत. केरळमध्ये कोरोनाचा सर्वात नवीन प्रकार आढळून आला आहे, ज्यामुळे प्रथम सिंगापूर आणि नंतर अमेरिका आणि चीनमध्ये प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
