Advertisement
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला आहे. दक्षिण मुंबईपासून ते कोल्हापूरपर्यंतच्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला आहे. मनसे लोकसभेच्या 25 जागा लढण्याच्या मनस्थितीत आहे. तशी माहितीच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे. सर्वच लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली. आजच्या बैठकीत 25 च्यावर लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला आहे. आम्ही 25 जागा लढण्याच्या मनस्थितीत आहोत. आमच्यासाठी चांगली परिस्थिती दिसत आहे, असं आमदार राजू पाटील म्हणाले.
आमदार राजू पाटील आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांननी मीडियाशी संवाद साधला. यावेळी राजू पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली. राऊत यांनी आत्मपरीक्षण करावं. त्यांचं स्वत:चं काय सुरू आहे ते पाहा. आम्ही आहोत तिथेच आहोत. आम्ही आजपर्यंत कुठे युती किंवा आघाडी केली नाही. त्यांनी कोणा कोणाशी कधी कधी युती केली आहे त्याचं आत्मपरीक्षण करावं, असा चिमटा राजू पाटील यांनी काढला.
