#

Advertisement

Friday, December 29, 2023, December 29, 2023 WIB
Last Updated 2023-12-29T12:38:11Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

लोकसभा निवडणुकीत उमेदवार निवड चुकली की सोलापुरात भाजपचा पराभव

Advertisement


इतिहासातील आकडेवारी आणि स्थितीवरून सर्वकाही स्पष्ट 

सोलापूर : लोकसभा निवडणुकीचा मागील इतिहास पाहता या मतदार संघावर काग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. परंतु, कांग्रेसचे वर्चस्व मोडीत काढण्यात भारतीय जनता पक्षालाच यश आले आहे. साधारण दोन टर्म म्हणले दहा वर्षांच्या फरकाने सोलापुरात कांग्रेसचा आणि त्यानंतर भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी भाजपला कांग्रेसच्या उमेदवारापुढे नवा चेहरा द्यावा लागला आहे. आता, २०२४च्या लोकसभा निवडणुकीचा विचार करता २०१४ आणि २०१९ या दोन्ही वेळी भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे आता मागील इतिहास पाहता २०२४ मध्ये कांग्रेसचा उमेदवार निवडून येण्याची अधिकाधिक शक्यता आहे. जर, भाजपला हा इतिहास मोडून काढायचा असेल तर पुन्हा नवा चेहरा आणि तेवढ्याच ताकदीचा उमेदवार द्यावा लागणा आहे. अन्यथा, उमेदवारी निवडीत चूक झाली तर भाजपचा पराभव ठरलेला आहे. त्यातच कांग्रेसकडून आता प्रणिती शिंदे लोकसभा निवडणूक लढविणार आहे, त्यामुळे साहजिकच भाजपला महिला उमेदवराचाच शोध घ्यावा लागेल. उमेदवार निवडीचा अंदाज चुकला तर सोलापुरात भाजपचा पराभव नक्की आहे.
याबाबत आपण मागील काही पार्श्वभूमी पाहु यात.... 1952 साली सोलापूर लोकसभा मतदार संघाची स्थापना झाली. सुरुवातीचे पाच वर्ष शेतकरी कामगार पक्षाचे शंकर मोरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शेड्युल कास्ट फेडरेशनचे पी. एन. राजभोग यांनी सोलापूरचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलं. 1957 साली सोलापुरात संयुक्त महाराष्ट्र समितीचे जयवंत मोरे हे सोलापूरचे खासदार झाले. मतदारसंघ स्थापनेच्या 10 वर्षानी सोलापुरात 1962 साली काँग्रेसचा उदय झाला. 1996 आणि 2003 या दोन निवडणुकांचा अपवाद वगळला तर 2014 पर्यंत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व सोलापूर लोकसभा मतदार संघात गाजवलं. 1962 साली मडेप्पा उर्फ अप्पासाहेब काडादी, 1967, 1971, 1977 सुरजरत्न दमाणी, 1980, 1984 गंगाधर कुचन, 1989, 1991 धर्मन्ना सादुल या काँग्रेस नेत्यांनी सोलापुरात खासदारकीच्या माध्यमातून देशाच्या संसदेत नेतृत्व केल आहे.
1996 मात्र काँग्रेसच्या विजयाचा रथ भाजपच्या लिंगराज वल्याळ यांनी पहिल्यांदा रोखला. लिंगराज वल्याळ यांच्या रूपाने केवळ सोलापूरचाच नाही तरं पश्चिम महाराष्ट्रातील पहिला खासदार भारतीय जनता पार्टीला मिळाला. मात्र केंद्रात इंदर कुमार गुजराल यांची सत्ता कोसळली त्यामुळे 1998 साली पुन्हा एकदा देशात निवडणुका लागल्या. याचं निवडणुकामध्ये सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या माध्यमातून काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री झाली. 1998 आणि 1999 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस तर्फे निवडणूक लढवत विजय मिळवला. 2003 साली सुशीलकुमार शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या सोलापूरच्या लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी बाजी मारली. त्यानंतर 2004 च्या लोकसभा निवडणुकीत भाजच्याच सुभाष देशमुखानी विजय मिळवला.
भाजपच्या विजयाचा गाडा 2009 साली सुशीलकुमार शिंदेनी पुन्हा एकदा रोखला. भाजपचे नवखे असलेले उमेदवार शरद बनसोडे यांचा पराभव करत सुशीलकुमार शिंदे यांनी पुन्हा एकदा सोलापूर लोकसभा मतदारसंघात एन्ट्री केली. याच काळात शिंदे यांना केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय ऊर्जामंत्री, लोकसभेचे सभागृह नेते सारखे मोठी पदे भोगता आली. मात्र असं असताना देखील 2014 च्या मोदी लाटेत त्यांचा निभाव लागला नाही. नवख्या शरद बनसोडे यांच्याकडून शिंदेना परभावाचा स्वीकारवा लागला. सोलापूर लोकसभा हा तसा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जातो.मात्र 2014 च्या मोदी लाटेत काँग्रेसचा बुरुज ढासळला आणि हा मतदारसंघ भाजपकडे आला. नवखे असलेल्या शरद बनसोडे यांचा तब्बल दीड लाख मतांनी विजय झाला. त्यानंतर 2019 साली झालेल्या सलग दुसऱ्या निवडणुकीत देखील सुशीलकुमार शिंदेना परभवाचा सामना करावा लागला. भाजपच्या डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामिनी शिंदे सारख्या दिग्गज नेत्याला धूळ चारली.
2019 च्या निवडणुकीच्या प्रचारातच सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीसाठी सोलापूर शहर मध्यच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचं नाव सुशीलकुमार शिंदे यांनी खासदारकीचे उमेदवार म्हणून सांगितलेय. आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील लोकसभेच्या दृष्टीने  तयारी सुरु केली आहे. तर मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून सुधीर खरटमल यांनीही उमेदवारीची मागणी केली. भाजपकडून यंदा कुणाला तिकिट मिळेल, याचीही चर्चा सुरु आहे. आता , डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे जातीचे दाखले वादग्रस्त ठरल्याने पुन्हा तिकिट मिळणार की भाजप नव्या उमेदवाराला संधी देणार ? याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.  राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे, सोलापूरचे माजी खासदार शरद बनसोडे, माळशिरसचे आमदार राम सातपूते,  माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे तसेच त्यांच्या कन्या ऍड. कोमलताई ढोबळे यांच्याही नावाची चर्चा सुरु आहे.