Advertisement
सोलापूर : सोलापूर शहरात एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तत्कालीन पोलीस निरीक्षकांच्या संमतीने दोन लाखांची लाचेची मागणी करत एक लाख रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी पोलीस उपनिरीक्षकाने दर्शवली होती. याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विक्रम राजपूत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी फिर्याद नोंदवल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विक्रम राजपूतविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
एका व्यक्तीवर ॲट्रॉसिटी आणि इतर गुन्हे दाखल असताना त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तक्रारदार आणि त्यांच्या मित्राकडून लाचेची मागणी पोलीस उपनिरीक्ष विक्रम राजपूत यांनी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने याविषयी तक्रार दाखल केली होती. त्यांनतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत विक्रम राजपूत यांना अटक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
